मुंबई - आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे आज होणारा कोलकाता विरूद्ध बंगळुरू हा सामना स्थगित करण्यात आला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या स्टाफमधील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर डीडीसीएच्या ग्राउंड स्टाफमधील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. या विषयावरून भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी रोखठोक मत मांडलं आहे.
किर्ती आझाद यांनी एका क्रीडा संकेत स्थळाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना आझाद म्हणाले की, मला वाटत होतं की, खेळाडू बायो बबलमध्ये सुरक्षित राहून क्रिकेट प्रेमी आणि देशवासियांचे मनोरंजन करत आहेत. पण दुर्दैवाची गौष्ट अशी आहे की, बायो बबलमध्ये राहून देखील खेळाडूंसह स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सरळ बाब आहे की, सुरक्षेची यात कमी आहे. जर आणखी काही जणांना लागण झाल्यास ही स्पर्धा थांबवली पाहिजे.'
सहा दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. सातव्या दिवशी तुम्हाला याबद्दल माहिती मिळते. केकेआर आणि सीएसकेच्या स्टाफसोबत जे झालं, यात सुरक्षेची कमी होती. ज्याला आपण सुरक्षित झोन समजत होते. पहिली गोष्ट सुरक्षेची कमी आहे. दुसरी कोरोना अदृश्य स्वरुपात असल्याने तो खूप धोकादायक आहे. तिसरा हा व्हायरस जीवघेणा आहे. यामुळे ही स्पर्धा थांबवली पाहिजे, असे देखील आझाद म्हणाले.