मुंबई - आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याला आपल्या संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रू टायने वैयक्तिक कारणासाठी आयपीएलच्या चौदाव्या हंगामामधून माघार घेतली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सने टायच्या जागेवर शम्सीला आपल्या ताफ्यात शामिल करून घेतले.
आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सन टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज तबरेज शम्सीसोबत करार केला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ट्विट करत याची माहिती दिली. अँड्रू टाय आणि जोफ्रा आर्चर वेगवेगळ्या कारणामुळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर गेले आहेत. तर बेन स्टोक्स बाबत देखील अद्याप अनिश्चितता आहे. पण बेन स्टोक्स बाबत राजस्थान रॉयल्स लवकरच घोषणा करणार आहे.