मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. उभय संघातील हा सामना रोमांचक झाला. यात फाफ डू प्लेसिसच्या नाबाद ९५ धावा आणि ऋतुराज गायकवाडचे (६४) अर्धशतक याच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ३ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या ३१ धावात कोलकात्याचा निम्मा संघ तंबूत परतला. तेव्हा आंद्रे रसेलने स्फोटक खेळी करत सामन्यात रंगत आणली. पण त्याला एका चेंडूचा अंदाज आली नाही आणि कोलकात्याला त्याची भारी किंमत चुकवावी लागली.
घडले असे की, आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक या जोडीने निम्मा संघ माघारी परतल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. कोलकाताने ११ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ११५ धावा फलकावर लावल्या. रसेल-कार्तिक ही जोडी तुफान फटकेबाजी करत होती. तेव्हा धोनीने सॅम कुरेनला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्याने रसेलला लेग स्टम्पवर चेंडू फेकला. तेव्हा रसेलला हा चेंडू वाईट जाईल असे वाटले. पण चेंडू थोडासा स्विंग होऊन थेट स्टम्प्सवर आदळला आणि सॅम कुरेनने एकच जल्लोष केला.