मुंबई - मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या ९२ धावांच्या खेळीमुळे दिल्लीला पंजाबला सहज पराभूत केले.
DC VS PBKS : पंजाबवर ६ गडी राखून दिल्लीने गाठले विजयाचे 'शिखर' - delhi vs punjab dream11
मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला.
![DC VS PBKS : पंजाबवर ६ गडी राखून दिल्लीने गाठले विजयाचे 'शिखर' IPL 2021, 11th Match: Delhi Capitals vs Punjab Kings Match updates](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11450849-879-11450849-1618749051298.jpg)
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पंजाब किंग्जकडून के.एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी तडाखेबंद सुरूवात करत पहिल्या दोन षटकात २५ धावा केल्या. मुरुगन अश्विनच्या जागी दिल्लीच्या संघात स्थान मिळालेल्या लुकमान मेरीवालाच्या पहिल्या षटकात दोघांनी २० धावा ठोकल्या. पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या सलामी जोडीने १० च्या सरासरीने ५९ धावा झळकाव्या. मागील काही सामन्यात खराब फॉर्ममधून जात असलेल्या मयंकने अर्धशतक झळकावले. १० षटकात पंजाबने बिनबाद ९४ धावा केल्या. १३व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले. मेरीवालाने स्थिरावला फलंदाज मयंकला बाद केले. मयंकने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी १२२ धावांची सलामी दिली.
मयंक बाद झाल्यानंतर कर्णधार राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. १६ व्या षटकात राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. राहुलने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. राहुलनंतर गेलही लवकर तंबूत परतला. वोक्सने त्याला बाद केले. गेलने ९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ११ धावा केल्या. दिपक हुडाने १३ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा केल्यामुळे पंजाबला पावणे दोनशेचा आकडा ओलांडता आला. निकोलस पुरनने ९ तर शाहरुख खानने १५ धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या गोलंदाजांनी ८ धावा अवांतर दिल्या. पंजाबने निर्धारित २० षटकात ४ बाद १९५ धावा केल्या. दिल्लीकडून लुकमान मेरीवाला, ख्रिस वोक्स, आवेश खान व कासिगो रबाडाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.