शारजाह -आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इतर मैदानाच्या तुलनेने लहान असलेल्या शारजाहच्या मैदानात यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. मुंबईचा सलीमीवीर फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात षटकार खेचून आपल्या खेळीची सुरुवात केली. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
या कामगिरीसह रोहितने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हैदराबादच्या संदीप शर्माने टाकलेल्या सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर रोहितने षटकार खेचला होता. मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर रोहित यष्टीरक्षक जॉनी बेअस्टोला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधीचे सामन्यातील पहिले ३ चेंडू रोहितने निर्धाव खेळले. त्यामुळे रोहित हा आयपीएलच्या एका डावात षटकार खेचल्यानंतर बाद होणारा दुसराच भारतीय सलामीवीर आहे.