अबुधाबी -राजस्थानचा सलामीवीर म्हणून सलामीच्या पाच सामन्यात अपयशी ठरलेला आणि टीकेचा सामना करावा लागलेला बेन स्टोक्स पुन्हा फॉर्मात परतला आहे. त्याच्या शेवटच्या दोन खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनेही आपला विजयी फॉर्म पुन्हा मिळवला आहे.
शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सने २६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. मागील सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची पिसे काढत ६० चेंडूत १०७ धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळीनंतर राजस्थानचा संघही विजयाच्या मार्गावर परतला.
मुंबईविरुद्धच्या डावापूर्वी स्टोक्सने पाच डावांमध्ये केवळ ११० धावा केल्या होत्या. त्याला एकही षटकार मारता आला नाही. यानंतर त्याच्यावरही टीका झाली होती. राजस्थान संघाचा अष्टपैलू राहुल तेवतिया म्हणाला, ''स्टोक्सचा फॉर्म परतल्याने संघाची वरची फळी भक्कम झाली आहे.''
शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर तेवतिया म्हणाला, "आमचे दोन-तीन फलंदाज लवकर बाद होत होते. आता ते धावा करत आहेत. पूर्वी आमची वरची फळी भक्कम नव्हती. परंतू आता तो धावा करत आहे. आमची मधली फळीही मजबूत आहे. आता सर्वजण सकारात्मक क्रिकेट खेळत आहेत. म्हणूनच चांगले निकाल येत आहेत."