अबुधाबी - आयपीलएलच्या तेराव्या हंगामात काल (रविवारी) सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान सामना खेळवला गेला. हा सामना सुरू झाल्यानंतर खेळांडूंपेक्षा सामन्याच्या अंपायरचीच चर्चा जास्त रंगली. पहिल्यांदाच असे झाले असेल की, सोशल मीडियावर अंपायर चर्चेचा विषय झाले.
आयपीएल अंपायरच्या केसांचीच चर्चा जास्त! - पश्चिम पाठक न्यूज
आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जात आहे. हंगाम मध्यावर आला असून काल सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान झालेला सामना विविध कारणांसाठी चर्चेत आला. त्यातील एक कारण फारच गमतीशीर आहे.
![आयपीएल अंपायरच्या केसांचीच चर्चा जास्त! Paschim Pathak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9229640-thumbnail-3x2-hairs.jpg)
काल झालेल्या पहिल्या सामन्यात पश्चिम पाठक यांनी अंपायर म्हणून काम पाहिले. पाठक हे त्यांच्या खांद्यापर्यंत रुळणाऱ्या केसांमुळे आणि उभे राहण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आले. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा केली. कुणी त्यांना महेंद्रसिंह धोनी म्हटलं तर, कुणी रॉकस्टार. एका चाहत्याने ट्विट केले आहे, 'पश्चिम पाठक यांनी धोनीकडून प्रेरणा घेतलेली दिसते'. आणखी एकाने ट्विट केले की, "पश्चिम पाठक रॉकस्टार आहेत."
शेख जाएद स्टेडियममध्ये झालेल्या रंगतदार सामन्यात कोलकाताने सनराइजर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये हरवले. दोन्ही संघांनी निर्धारित षटकांमध्ये समान 163 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत हैदराबादने कोलकात्यासमोर फक्त तीन धावांचे लक्ष्य ठेवले होते.