अबुधाबी -बेन स्टोक्सच्या शतकाने रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईवर सहज विजय मिळवला. राजस्थानकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने ६० चेंडूंत ३ षटकार आणि १४ चौकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. तर त्याला संजू सॅमसननेही चांगली साथ दिली. सॅमसननेही तुफान फटकेबाजी करत ३१ चेंडूंत ३ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद अर्धशतक ठोकत ५४ धावा केल्या. तर त्यापाठोपाठ रॉबिन उथप्पाने ११ चेंडूंत १३ धावा केल्या. तसेच स्टिव्ह स्मिथने ८ चेंडूंत १ षटकार आणि १ चौकार ठोकत ११ धावा केल्या. त्याला पैटिनसनने त्रिफळाचीत केले.
तर मुंबईकडून गोलंदाजी करताना पैटिनसनने दोन बळी मिळवले. बाकीच्या एकही गोलंदाजांना राजस्थानच्या फलंदाजांना रोखता आले नाही. याप्रकारे राजस्थानने मुंबईवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. राजस्थानकडून शतक ठोकणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती.
तत्पूर्वी, हार्दिक पांड्याच्या झंझावाती अर्धशतकामुळे मुंबईने राजस्थानसमोर २० षटकात ५ बाद १९५ धावा केल्या. कार्तिक त्यागीच्या शेवटच्या षटकात २७ धावांची लयलूट करत हार्दिकने संघाची धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचवली.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मागच्या सामन्यात चेन्नईवर हल्लाबोल केलेल्या इशान किशन आणि क्विंटन डी कॉकने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने पहिल्या षटकात डी कॉकला बाद केले. त्यानंतर किशन-सूर्यकुमारने ८२ धावांची भागीदारी रचली. किशनने ३७ धावा केल्या. जोफ्रा आर्चरने किशनचा अप्रतिम झेल घेतला. किशननंतर सूर्यकुमारही ४० धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहितच्या बदली संधी मिळालेल्या सौरभ तिवारीने ३४ धावांची खेळी करत संघात बहुमुल्य योगदान दिले. सौरभ आणि हार्दिकमुळे संघाची धावसंख्या दीडशेपार गेली. हार्दिकने ७ षटकार आणि २ चौकारांची आतषबाजी करत केवळ २१ चेंडूत नाबाद ६० धावा टोलवल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपालने प्रत्येकी २ बळी घेतले.
LIVE UPDATE :
- बेन स्टोक्स सामनावीर.
- स्टोक्सचा दुसऱ्या चेंडूवर चौकार; राजस्थान विजयी
- १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टोक्सचा षटकार; ५९ चेंडूत १०३ धावांवर नाबाद
- १८ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १८६ धावा.
- १७ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १८२ धावा.
- १६ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १७२ धावा.
- १५ व्या षटकांत संजू सॅमसनचे अर्धशतक.
- १५ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १५७ धावा.
- १४ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १४४ धावा.
- १3 षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १२६ धावा.
- १२ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १०७ धावा.
- दहा षटकानंतर राजस्थानच्या २ बाद ९९ धावा.
- बेन स्टोक्सचे अर्धशतक,खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- संजू सॅमसन मैदानात.
- स्मिथ ११ धावांवर बाद, पॅटिन्सनचा दुसरा बळी.
- चार षटकात राजस्थानच्या १ बाद ४१ धावा.
- स्टिव्ह स्मिथ मैदानात.
- राजस्थानला पहिला हादरा, पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर उथप्पा १३ धावांवर झेलबाद.
- राजस्थानच्या पहिल्या षटकात बिनबाद ५ धावा.
- ट्रेंट बोल्ट टाकतोय मुंबईसाठी सलामीचे षटक.
- राजस्थानचे सलामीवीर स्टोक्स-उथप्पा मैदानात.
- २० षटकात मुंबईच्या ५ बाद १९५ धावा.
- २०व्या षटकात मुंबईने काढल्या २७ धावा.
- हार्दिक पांड्या २१ चेंडूत ६० धावांवर नाबाद. खेळीत ७ षटकार आणि २ चौकारांचा समावेश.
- हार्दिक पांड्याचे २० चेंडूत धमाकेदार अर्धशतक, खेळीत ६ षटकार आणि २ चौकारांचा समावेश.
- १९ षटकात मुंबईच्या ५ बाद १६८ धावा.
- कृणाल पांड्या मैदानात.
- सौरभ तिवारी ३४ धावांवर बाद.
- अठराव्या षटकात पांड्याचे चार चौकार.
- पंधरा षटकानंतर मुंबईच्या ४ बाद ११६ धावा.
- पोलार्ड ६ धावांवर बाद, गोपालचा दुसरा बळी.
- मुंबईचा कर्णधार पोलार्ड मैदानात.
- सूर्यकुमार ४० धावांवर बाद, गोपालने केले झेलबाद.
- सौरभ तिवारी मैदानात.
- कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर आर्चरने घेतला किशनचा भन्नाट झेल.
- मुंबईला दुसरा धक्का, किशन ३७ धावांवर बाद.
- दहा षटकानंतर मुंबईच्या १ बाद ८९ धावा.
- सात षटकानंतर किशन २७ तर सूर्यकुमार २१ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर मुंबईच्या १ बाद ४५ धावा.
- पहिल्या षटकात मुंबईच्या १ बाद १० धावा.
- सूर्यकुमार मैदानात.
- षटकार ठोकून डी कॉक बाद. आर्चरला मिळाला बळी
- डी कॉककडून डावाचा पहिला षटकार.
- मुंबईचे सलामीवीर किशन-डी कॉक मैदानात.
- मुंबईची फलंदाजी.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.