अबुधाबी - आज शेख झायेद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना रंगला. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो अशा अवस्थेतील होता. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले. त्याचा पाठलाग करत राजस्थानने सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ते गुणतक्त्यात ५व्या स्थानावर आले आहेत.
'युनिव्हर्स बॉस'च्या तडाखेबंद ९९ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्ससमोर २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. २०व्या षटकात राजस्थानचा तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरने गेलच्या शतकी स्वप्नांना सुरूंग लावत पंजाबच्या चाहत्यांना धक्का दिला. गेलने ६३ चेंडू खेळताना ८ षटकार आणि ६ चौकार ठोकत राजस्थानच्या गोलंदाजांना नामोहरम केले.
नाणेफेक जिंकून राजस्थानने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर मनदीप सिंह शून्यावर माघारी परतला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने मनदीपचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. राहुलने संयमी तर गेलने नैसर्गिक पवित्रा धारण करत १२० धावांची भागिदारी रचली. स्टोक्सच्या गोलंदाजीवर राहुल ४६ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर गेल आणि पूरन या विंडीजच्या फलंदाजांनी पंजाबची धावसंख्या वाढवली. दोन जीवदानांचा फायदा उचलत गेलने आपली खेळी सजवली. निकोलस पूरनने १० चेंडूत ३ षटकारांसह २२ धावा चोपल्या. तर, मॅक्सवेल आणि दीहक हुडा नाबाद राहिले. राजस्थानकडून आर्चर आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
राजस्थानच्या आजच्या विजयाने पंजाब आणि त्यांचे गुण समान म्हणजे १४ गुण झाले. पण नेटरनरेटच्या जोरावर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल २०२० मध्ये साखळी फेरीतील ५० सामने झाल्यानंतर देखील अद्याप फक्त एकच संघ प्ले-ऑफमध्ये गेला आहे. मुंबई इंडियन्स १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स १४ गुण आणि + ०.०४८ रनरेटसह दुसऱ्या तर दिल्ली कॅपिटल्स १४ गुण आणि +०.०३० रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.