दुबई -आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ३०व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्जे याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमध्ये, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू फेकला.
एनरिकने बटलरच्या दांड्या केल्या गुल... एनरिकने राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकात पाचवा चेंडू 156.22 किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला. हा चेंडू आईपीएल 2020 मध्येच नाही तर आयपीएलच्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू आहे. दरम्यान, या चेंडूवर राजस्थानच्या जोस बटलरने चौकार वसूल केला. यानंतर एनरिकने पुढील चेंडू 155.21 किलोमीटर प्रति तास वेगाने फेकत बटलरच्या दांड्या गुल केल्या. एनरिकचे ते दोनही चेंडू या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरले आहेत.
आयपीएलमध्ये याआधी सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावे होता. त्याने 2012 मध्ये 155 किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू फेकला होता. या यादीत कगिसो रबाडा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 154.23 किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू फेकला आहे.
दरम्यान, सलामीवीर शिखर धवन (57) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (53) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक आणि सावध सुरूवात केली. परंतू ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे राजस्थानला 13 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.