शारजाह - फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची भेदक गोलंदाजी आणि त्यांना इतरांनी दिलेली दमदार साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) शारजाहच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. १९५ धावसंख्येचे आव्हान पार करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) फलंदाजांची दमछाक झाली. एबी डिव्हिलियर्सने केलेली तडाखेबंद खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली.
VIDEO : षटकार असा की, चेंडू थेट रस्त्यावर! - एबी डिव्हिलियर्स लेटेस्ट न्यूज
एबी डिव्हिलियर्स हा स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे उत्तुंग षटकार कधी कुठे जाऊन पडतील सांगता येत नाही. आयपीएलच्या सामन्यादरम्यान त्याने मारलेला एक षटकार थेट मैदानाबाहेरील रस्त्यावर जाऊन पडला.
डिव्हिलियर्स आणि विराट कोहली फलंदाजी करत असताना १५व्या षटकात कमलेश नागरकोटी गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डिव्हिलियर्सने उत्तुंग षटकार खेचला. चेंडू थेट मैदानाबाहेरील रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या पुढे जाऊन पडला. अचानक येऊन पडलेल्या चेंडूमुळे कारचालकही गडबडला. हा चेंडू रस्ता पार करून दुसऱ्या टोकाला गेला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या बंगळुरूने कोलकातासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले होते. डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकामुळे बंगळुरूला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावा टोलवल्या. त्याच्या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.