मुंबई- कोलाकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. तर, कोलकाता पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
शानदार विजयासह मुंबई इंडियन्स अव्वलस्थानी विराजमान; आता सामना चेन्नईशी - ipl2019
आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर सामना होणार आहे
लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना कोलकात्याला १३३ धावांवर रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने सामना सहज खिशात घातला. यात रोहितने अर्धशतक (५५) झळकावले तर, सूर्यकुमारने त्याला सुरेख साथ देत २७ चेंडूत ४६ धावा काढल्या.
तत्पूर्वी पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदांजांना बांधून ठेवण्यात यश मिळवले. कोलकाताकडून ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला त्यांच्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र, हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ लाभू शकली नाही. ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे कोलकाताचा संघ मोठी भागीदारी रचू शकला नाही. मुंबईकडून लसिथ मलिंगाने सर्वाधिक ३ बळी घेतले.