नवी दिल्ली - दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. २० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत १ बाद १० धावा केल्या आणि कोलकाताला ११ धावांचे आव्हान दिले. पण कोलकाताला केवळ ७ धावाच जमवता आल्या.
अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याच्या नादात दिल्लीने आपले विकेट्स गमावले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांच्या निर्धारीत २० षटकांमध्ये १८५ धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाने कर्णधार दिनेश कार्तिक (५०) आणि आंद्रे रसेल (६२) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या.
तर पृथ्वी शॉने शानदार कामगिरी करत ५५ चेंडूत धावांची ९९ खेळी केली. त्याने दणदणीत १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचे शतक एका धावाने हुकले. दिल्लीकडून शिखर धवनने (१६) कर्णधार श्रेयस अय्यरने (४३) तर ऋषभ पंतने (११) धावांचे योगदान दिले.
कोलकाताकडून पीयुष चावला, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन आणि आंद्रे रसेल याला एक गडी बाद करता आले.
आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या निखील नाईकने निराशा केली. तो ७ धावा काढून लामिछानेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर ख्रिस लीनने २० धावा काढल्या. मागील सामन्यातला हिरो नीतीश राणा आणि रॉबिन उथप्पा यांना या सामन्यात छाप पाडता आली नाही. शुभमन गिल ४ धावांवर धावबाद झाला.
त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी सामन्याची सूत्रे हाती घेत संघाचा डाव सावरला. सहाव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी केली. मैदानाच्या चारही बाजूने त्यांनी फटकेबाजी केली. दिनेशने ५० धावाच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. आंद्रे रसेलने ६२ धावांची खेळी केली. त्यात ६ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी केली.
दिल्लीकडून रबाडा, लामिछाने, ख्रिस मॉरिस आणि अमित मिश्रा यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. तर हर्षल पटेल यांस २ गडी बाद करण्यात यश आले.