नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. प्रथमच पूर्णवेळ कसोटी उपकर्णधारपदी निवड झालेला रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा कसोटी संघासोबतचा दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टीम इंडिया सध्या प्रोटोकॉलनुसार मुंबई विमानतळाजवळ तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईनमध्ये आहे आणि भारतीय संघ 16 डिसेंबर रोजी चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला जाईल. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर खेळाडूंना स्थानिक नियमांनुसार प्रोटोकॉल अंतर्गत क्वारंटाईन करावे लागेल. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.
नेट प्रॅक्टिस दरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली जेव्हा थ्रो-डाऊन विशेषज्ञ राघवेंद्र त्याला प्रशिक्षण देत होते. यादरम्यान राघवेंद्रचा एक उसळता थ्रो रोहितच्या ग्लोव्हजला लागला आणि त्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. याआधी अजिंक्य रहाणेलाही राघवेंद्रच्या थ्रोने दुखापत झाली आहे. ही दुखापत टीम इंडियासाठी आणि विशेषतः रोहित शर्मासाठी मोठा धक्का आहे. रोहितला लवकरच एक्स-रेसाठी रुग्णालयात नेले जाईल.