दुबई - अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 106 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळाले आणि टीम इंडियाने एक विकेट गमावून ते पूर्ण केले.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 38 षटकांचा झाला होता. सामन्यात श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांची पहिली विकेट तीन धावांवर पडली. यानंतर श्रीलंकेच्या विकेट्स अधूनमधून पडत राहिल्या आणि अखेरीस या संघाला नऊ गडी गमावून १०६ धावा करता आल्या. पावसामुळे या सामन्यातील 12 षटके कमी करण्यात आली. तसे झाले नसते तर लंकेला पूर्ण ५० षटके खेळणे कठीण झाले असते.
अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकेच्या संघाला 106 धावांत रोखले. भारताकडून विकी ओस्तवालने तीन, कौशल तांबेने दोन आणि राज बावा, रवी कुमार, राजवर्धन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर श्रीलंकेचा एक फलंदाज धावबाद झाला.