जोहान्सबर्ग -भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात द. आफ्रिका संघाने पहिल्या डावात सर्व बाद 229 धावा केल्या आहेत. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळवली होती. भारताचा दुसरा डाव मयंक अग्रवाल आणि केएल राहुलने सुरू केला. दिवस अखेरीस या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स पडल्या. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 82 धावा केल्या आहेत. भारताने द. आफ्रिकेपेक्षा 58 धावांची आघाडी मिळवली आहे.
भारताचा दुसरा डाव, दिवस अखेरीस भारत 2 बाद 82
भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली असे वाटत असतानाच केएल राहुलबाद झाल्यामुळे संघाला पहिला झटका बसला आहे. 24 धावावर भारताचा पहिला गडी बाद झाली. राहुल 8 धावा काढून बाद झाला. मयंक अग्रवालचा जम बसला आहे असे वाटत असताना तो 23 धावावर पायचीत झाला. अशा प्रकारे भारताने दुसरी विकेट गमावली. चेतेश्वर पुजाराची साथ देण्यासाठी उतरलेल्या अजिंक्य रहाणेने दिवस अखेरपर्यंत उत्तम साथ दिली. चेतेश्वर पुजारा नाबाद 35 व अजिंक्य रहाणे नाबाद 11 धावावर खेळत आहेत.
द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्व बाद 229 धावा
सलामीवीर डीन एल्गरला चकवण्यात शार्दुल ठाकूरला यश मिळाले. 28 धावा नावावर असताना ऋषभ पंतच्या हाती झेल देऊन तो तंबूत परतला आहे. त्या पाठोपाठ किगन पीटरसनलाही चकवण्यात शार्दुलला यश आले. मयंक अग्रवालच्या हाती झेल देऊन तो 62 धावावर परतला. शार्दुलच्या आक्रमक माऱ्यापुढे रॅसी व्हॅन डर डुसेन टिकू शकला नाही. 17 चेंडू खेळून केवळ 1 धावावर त्याला शार्दुलने माघारी धाडले. टेम्बा बावुमा व काइल वेरेन यांनी 60 धावांची भागीदारी करीत द. आफ्रिकेच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र पुन्हा एकदा शार्दुलच्या गोलंदाजीवर तो पायचीत होऊन 21 काढून बाद झाला. त्यानंतर टेम्बा बावुमादेखील फारवेळ तग धरू शकला नाही. 60 चेंडूत झटपट 51 धावा ठोकल्यानंतर त्याला शार्दुलने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ कागिसो रबाडा खाते न उघडताच बाद झाला. मोहम्मद शामीने त्याला सिराजच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. शार्दुल ठाकूरने 5 गडी बाद केले. मार्को जॅन्सन व केशव महाराज या जोडीने अखेरीस चांगली खेळी करीत संघाचे द्विशतक झळकवले. 217 धावा झाल्या असताना केशव महाराजचा जसप्रित बुमराहने क्लिनबोल्ड केले. काही वेळानंतर मार्को जॅन्सन उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात 21 धावावर बाद झाला. शार्दुल ठाकरने त्याला चकवले. त्यापाठोपाठ लुंगी एनगिडीलाही बाद करुन या सामन्यात शार्दुलने 7 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. मोहम्मद शामीने 2 तर जसप्रित बुमराहने 1 गडी बाद केला.
द. आफ्रिका संघाने पहिल्या डावात सर्व बाद 229 धावा केल्या आहेत. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळवली आहे.
सामन्याचा पहिला दिवस, भारत सर्वबाद 202 धावा