भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवस अखेरीस 63 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव 345 धावावर संपला होता. तर न्यूझीलंडने 296 धावा पहिल्या डावात काढल्या. सलमीवीर यंगने ८९ धावा केल्या तर सलामीवीर लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. दोघांनाही शतकाने हुलकावणी दिल्याचे चित्र तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले.
तिसऱ्या दिवस अखेर भारताची 63 धावांची आघाडी
भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिला क्रिकेट कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात खेळला जात आहे. सामन्याचा आज तिसरा दिवस संपला तेव्हा भारताने 1 बाद 14 असी धाव संख्या केली. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आज निराशा केली. केवळ 1 धावावर तो तंबूत परतला. त्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा डाव 296 धावावर आटोपला. भारताने पहिल्या डावात केलेल्या 345 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 49 धावांनी पिछाडीवर राहिला. तिसऱ्या दिवसाखेर भारताने 63 धावांची आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव अखेरच्या क्षणी गडगडला
न्यूझीलंडचे सलामी फलंदाज टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोघांनीही अर्धशतक झळकवून भारताला चोख प्रत्यूत्तर दिले होते. तिसऱ्या दिवशी यंगचे शतक 11 धावांनी हुकले. संघाची धावसंख्या दीडशे ओलांडल्यानंतर रवीचंद्रन अश्विनने यंगला यष्टीमागे झेलबाद केले. यंगने ८९ धावा केल्या, यात १५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यमसनला १८ धावांवर असताना उमेश यादवने पायचीत पकडले. लंचनंतर अक्षर पटेलने फिरकीची कमाल दाखवत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२) आणि सलामीवीर लॅथमला (९५) तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. त्यानंतर आलेला रचिन रवींद्रला जडेजाने बाद केले. अक्षर पटेलने टॉम ब्लंडेल आणि त्यानंतर टिम साऊदीला बाद करत पाच बळी पूर्ण केले. अश्विनने विल सोमरविलेला बाद केले आणि न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. रविचंद्रन अश्विनने या सामन्यात ३ बळी मिळवले.