भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिला क्रिकेट कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात खेळला गेला. सामन्याचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस संपला. न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनी चीवटपणे संयमी फलंदाजी केल्याने हा सामना अखेर अनिर्णित राहीला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरला. दुसऱ्या डावातही त्याने 65 ठावा ठोकून आपली चमक दाखवली होती.
न्यूझीलंड दुसरा डाव
पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या विल यंगला दगुसऱ्या डावात अपेक्षित कामगिरी जमली नाही. केवळ 2 धावावर तो बाद झाला. सलामीवीर लॅथमने आपला फॉर्म कायम राखत दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकले. तो 52 धावावर असताना बाद झाला. त्यानंतर रॉस टेलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसन 24 धावा काढू शकला. अक्षर पटेलने हेन्री निकोल्सला माघारी पाठवत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. शेवटचा एक तास बाकी असताना जडेजाने जेमीसनची विकेट घेऊन विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्यानंतर मात्र रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी संयमी आणि चीवट फलंदाजी करत भारताला विकेट मिळू दिली नाही. अखेर 9 बाद 165 धावा असताना खेळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. भारताकडून जडेजाने ४ तर अश्विनने ३ बळी घेतले. केवळ 1 विकेट शेवटच्या क्षणी घेता न आल्याने भारताच्या हातातून विजय निसटला.
भारताचा दुसरा डाव
भारत व न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवशी भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. रिद्धिमान साहा व श्रेयस अय्यर यांनी दमदार अर्धशतके ठोकली. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा दुसरा डाव सात बाद 234 धावांवर घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचे आव्हान दिले.
न्यूझीलंडचा पहिला डाव अखेरच्या क्षणी गडगडला
न्यूझीलंडचे सलामी फलंदाज टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोघांनीही अर्धशतक झळकवून भारताला चोख प्रत्यूत्तर दिले होते. तिसऱ्या दिवशी यंगचे शतक 11 धावांनी हुकले. संघाची धावसंख्या दीडशे ओलांडल्यानंतर रवीचंद्रन अश्विनने यंगला यष्टीमागे झेलबाद केले. यंगने ८९ धावा केल्या, यात १५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यमसनला १८ धावांवर असताना उमेश यादवने पायचीत पकडले. लंचनंतर अक्षर पटेलने फिरकीची कमाल दाखवत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२) आणि सलामीवीर लॅथमला (९५) तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. त्यानंतर आलेला रचिन रवींद्रला जडेजाने बाद केले. अक्षर पटेलने टॉम ब्लंडेल आणि त्यानंतर टिम साऊदीला बाद करत पाच बळी पूर्ण केले. अश्विनने विल सोमरविलेला बाद केले आणि न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. रविचंद्रन अश्विनने या सामन्यात ३ बळी मिळवले.
भारताने पहिल्या डावात केल्या ३४५ धावा
भारताचा पहिला डाव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३४५ धावांवर संपला होता. सलामीवीर शुबमन गिलची ५२ धावांची दमदार खेळीने न्यूझीलंडला सैरभैर केले. त्यानंतर मयंक अग्रवाल १३धावा काढून परतला. चेतेश्वर पुजाराने २६ धावा व कर्णधार अजिंक्य रहाणेने ३५ धावा काढत भारतीय संघाच्या कामगिरीत भर घातली. श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकवले. पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस १६वा भारतीय ठरला, तर जडेजानेही ६ चौकारांसह 50 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विननेही 38 धावा काढल्या. अशा तऱ्हेने भारतीय संघाने 345 धावसंख्या उभारली. न्यूझीलंड संघाच्या साऊदीने ६९ धावांत ५, जेमीसनने ३ तर पटेलने २ बळी घेतले.
दोन्ही संघांतील खेळाडू
भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.
न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.
हेही वाचा - Ind Vs Nz : Ips असीम अरुण यांनी गाजवला कानपूर कसोटी सामना