लंडन :भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव ( Fast bowler Umesh Yadav ) दुखापतीतून सावरू शकला नाही, त्यामुळे त्याला उर्वरित काउंटी हंगामाला मुकावे लागले ( Injury rules out Umesh Yadav County season ) आहे. शुक्रवारी त्याच्या क्लब मिडलसेक्स क्रिकेटने ( Club Middlesex Cricket ) याला दुजोरा दिला. रॉयल लंडन चषक स्पर्धेत ग्लॉस्टरशायरविरुद्ध रॅडलेटमध्ये मिडलसेक्सकडून खेळताना 34 वर्षीय वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली होती.
त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मिडलसेक्सने अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी रॉयल लंडन वन डे चषक ( Royal London One Day Cup ) सामन्यादरम्यान उमेशच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि उपचारासाठी तो भारतात परतला आहे. ग्लुसेस्टरशायरविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. आता त्याच्यावर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA ) मध्ये उपचार सुरू आहेत. मिडलसेक्सच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने त्याला सांगितले आहे की, तो सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि चार दिवसीय सामन्यांची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे तयार नाही. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मैदानात उतरवण्याची घाई होणार नाही.