गोल्ड कोस्ट - भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला संघाला त्यांच्याच देशात गुडघे टेकण्यास भाग पाडले. गोल कोस्टमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एकमात्र डे नाइट कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 377 धावांवर घोषित केला. यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 9 बाद 241 धावांवर आपला पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताला पहिल्या डावात 136 धावांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आज रविवारी या कसोटी सामन्याचा चौथा आणि अखेरचा दिवस आहे.
भारतीय महिला संघाने शानदार खेळ दाखवत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला चौथ्या दिवशी 241 धावांवर आपला डाव घोषित करण्यास भाग पाडले. भारताकडून पूजा वस्त्राकार हिने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर अनुभवी झूलन गोस्वामी, मेघना सिंह आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर अश्ले गार्डनरने 51 धावांचे योगदान दिले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 145 षटकात 8 बाद 377 धावा केल्या. यात सलामीवीर स्मृती मंधानाने 216 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकारासह 127 धावांची खेळी केली. याशिवाय दीप्ती शर्माने 66 धावांचे योगदान दिले. पूनम राऊत (36) आणि मिताली राजने 30 धावा केल्या. तर शफलीने 31 धावांची खेळी साकारली.