मुंबई INDW vs AUSW T20I : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. हा सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धारानं भारतीय महिला संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया महिला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करतील. भारतीय महिला संघ दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कदाचित कोणताही बदल करणार नाही. भारताकडून पहिल्या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी शानदार अर्धशतकं झळकावली होती.
सलामीवीरांकडून पुन्हा दमदार सुरुवातीची अपेक्षा : स्मृती मानधना आणि शेफाली दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतात. पहिल्या सामन्यात शेफालीनं नाबाद 64 धावा केल्या होत्या. या खेळीत तिनं 44 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. तर स्मृतीनं 52 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. भारतीय महिला संघ तिसऱ्या क्रमांकावर जेमिमाह रॉड्रिग्जला संधी देऊ शकते. जेमिमाने अनेक प्रसंगी शानदार फलंदाजी केली आहे. तिनं ऑस्ट्रेलियासह अनेक संघांविरुद्ध दमदार कामगिरी केलीय.
भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला T20 मध्ये हेड टू हेड रेकॉर्ड काय : आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 32 T20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतावर आघाडी घेतलीय. तरी भारतीय महिला संघानं सर्व शक्यता झुगारुन जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी सामन्यांची त्यांची संख्या 7 वर गेलीय. ऑस्ट्रेलियन महिलांनी भारताविरुद्ध 23 टी-20 सामने जिंकले आहेत. त्यापैकी एक सामना बरोबरीत संपला आणि एकाचा निकाल लागला नाही.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- भारत : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू
- ऑस्ट्रेलिया : अॅलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलियस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, मेगन शट, डार्सी ब्राउन
हेही वाचा :
- टी 20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार; जाणून घ्या
- फक्त 642 चेंडू अन् खेळ खल्लास! भारतानं तिसऱ्यांदा दोन दिवसात जिंकला कसोटी सामना, पहिले दोन कोणते?
- 53 वर्षांचं झालं एकदिवसीय क्रिकेट; आतापर्यंत कसा राहिला एकदिवसीय क्रिकेटचा प्रवास, वाचा सविस्तर