बर्मिंघम : भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. वूमन इन ब्लू ने 'आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघ' (IBSA) वर्ल्ड गेम्स 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे, महिला संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिला. टीम इंडियाने आपले सर्व लीग सामने जिंकले. भारतीय संघानं स्पर्धेतील आपल्या या नेत्रदीपक कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.
ऑस्ट्रेलियन संघावर फायनलचे दडपण दिसले : प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला निर्धारित २० षटकांत ८ बाद ११४ धावांवर रोखलं. त्यानंतर विजयासाठी ४२ धावांचे सुधारित लक्ष्य चौथ्या षटकातच गाठून विजयावर शिक्कामोर्तब केलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात संघानं पहिली विकेट गमावली. संघावर फायनलचं दडपण दिसत होतं. ऑस्ट्रेलियाने हळूहळू डाव पुढे नेत पॉवर-प्लेमध्ये २९ धावा केल्या.
भारताने ऑस्ट्रेलियाला कुठलीच संधी दिली नाही : भारताने आठव्या आणि नवव्या षटकात दोन गडी बाद केले. तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३९/३ झाली होती. यानंतर सी. लुईस आणि सी. वेबेक यांनी ५४ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र, त्यानंतर भारतानं ठराविक अंतराने विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन केलं. शेवटी, ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित २० षटकात केवळ ११४/८ धावा करू शकला. ४२ धावांच्या सुधारित लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कुठलीच संधी दिली नाही. टीम इंडियानं हे लक्ष केवळ ३.३ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात गाठलं.
पंतप्रधानांनी अभिनंदन केलं : IBSA ने गेल्या आठवड्यातच वर्ल्ड गेम्समध्ये अंध क्रिकेटचा समावेश केला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना खेळला गेला. जागतिक क्रीडा स्पर्धेतील हा पहिलाच अंतिम सामना होता. अशाप्रकारे भारत, अंध क्रिकेटच्या पहिल्या जागतिक स्पर्धेचा विजेता ठरला. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत संघाचे अभिनंदन केलं. 'IBSA वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचे अभिनंदन! आमच्या महिलांच्या अदम्य भावनेचे आणि प्रतिभेचे उदाहरण देणारी एक अतुलनीय कामगिरी. भारताला तुमचा अभिमान आहे! असं मोदी म्हणाले.
हेही वाचा :
- Yo Yo Test : ना हार्दिक, ना विराट; टीम इंडियाच्या यो-यो टेस्ट मध्ये 'हा' खेळाडू अव्वल
- Virat Kohli News : सोशल मीडियाच्या नादात विराट कोहलीचा बीसीसीआयशी 'पंगा', होऊ शकते कारवाई; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- Neeraj Chopra Olympic ticket : भालाफेकमध्ये नीरज चोप्राची कमाल, ऑलिंपिकचे तिकिट केले फायनल