हैदराबाद :श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामना 18 जानेवारीला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, सिराजने गेल्या एका वर्षात बरीच मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक बळी घेतले होते.
सिराजमुळे श्रीलंका 73 धावांत ऑलआउट : रोहित शर्माने सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजने 4 विकेट घेतल्या. त्याच्या मदतीनेच भारताने श्रीलंकेचा 317 धावांच्या फरकाने पराभव केला होता. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या मालिकेत मोहम्मद सिराजने 3 वनडेत 9 विकेट घेतल्या. सिराजने शेवटच्या सामन्यात 10 षटकात 32 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्याने नवीन चेंडूच्या बळावर श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणले होते. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला केवळ 73 धावांत ऑलआउट केले. रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही सर्व प्रयत्न केले, पण दुर्दैवाने सिराज 5 विकेट घेऊ शकला नाही.