लंडन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरोधात ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. पण उभय संघातील मालिकेला अद्याप ३ आठवड्यांचा अवकाश आहे. यामुळे खेळाडूंना बायो बबलमधून २० दिवसांसाठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांसमवेत मस्ती करताना दिसत आहेत.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिची मुलगी समायरासोबत एका पार्कमध्ये फिरताना पाहायला मिळाला. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणे याची मुलगी आर्याही दिसत आहे. रोहितने हा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
रोहितने शेअर केलेला फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते हा फोटो शेअर करत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज खालील अहमदनेही या फोटोला लाईक केले आहे.