नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक २०२३ च्या तयारीसाठी बंगळुरू येथे आयोजित विशेष शिबिरात सहभागी झालाय. येथे सर्व खेळाडूंची फिटनेस लेव्हल चेक करण्यासाठी त्यांची यो-यो टेस्ट घेतली जात आहे. यासोबतच काही विशेष सत्रांचे आयोजन करून त्यांना विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला विनाकारण दुखापत होऊ नये. मात्र, दुखापतग्रस्त के एल राहुलची यो-यो टेस्ट अद्याप झालेली नाही.
शुभमन गिलने अव्वल क्रमांक पटकावला : शिबिराच्या पहिल्या दोन दिवसात सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. अहवालानुसार, यो-यो टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांमध्ये युवा फलंदाज शुभमन गिलने सर्व दिग्गज खेळाडूंना मागे टाकत आघाडी मिळवलीय. शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले.
उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता : शुभमन गिलचा यो-यो टेस्ट स्कोअर १८.७ एवढा आहे. हा सर्व भारतीय खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. तर संघातील सर्वात फिट खेळाडू मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा स्कोअर १७.२ एवढा आहे. हा स्कोअर स्वतः कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यो-यो टेस्टमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी १६.५ गुणांची आवश्यकता असते.