मुंबई -भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा खेळाडू प्रिया पूनिया हिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. प्रियाच्या आईने आज अखेरचा श्वास घेतला. याची माहिती प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
प्रिया पूनियाच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर प्रियाने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रियाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं -
'तू मला नेहमी कणखर राहण्यास का सांगत होतीस, हे आता लक्षात येत आहे. एक दिवस तुला गमावण्याचे दुःख मला सहन करावे लागेल, हे तुला माहीत होते आणि त्यासाठी तू मला कणखर बनवलंस. पण मला तुझी आठवण येत आहे आई. तू माझ्यापासून कितीही लांब असलीस, तरी तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मला योग्य मार्ग दाखवणार. आयुष्यात सर्व प्रसंगांचा स्वीकार करणे अवघड आहे, अशा आशयाची भावनिक पोस्ट लिहित प्रियाने तिच्या दु:खाला वाट मोकळी करून दिली आहे.