महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind W Vs Aus W : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा दारूण पराभव - women cricket

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 225 धावा केल्या होत्या. यजमान ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

india-women-vs-australia-women-australia-women-won-by-9-wickets
Ind W Vs Aus W : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा दारूण पराभव

By

Published : Sep 21, 2021, 3:40 PM IST

Updated : Sep 22, 2021, 5:03 PM IST

मकाय - डार्सी ब्राउन (4/33) हिची शानदार गोलंदाजी यानंतर रेचल हेन्स (नाबाद 93) आणि एलिसा हिली (77) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने या विजयासह 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिताली राजच्या 107 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने केलेल्या 61 धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 8 बाद 225 धावा केल्या. भारताने दिलेले हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 41 षटकात एक गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. भारताकडून एकमात्र गडी पूनम यादवला टिपता आला.

भारतीय संघाने दिलेल्या 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रेचल आणि हिली या जोडीने दमदार सुरूवात केली. दोघींनी पहिल्या गड्यासाठी 126 धावांची सलामी दिली. पूनम यादवने हिलीला बाद करत ही जोडी फोडली. हिलीने 77 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारासह 77 धावांची खेळी केली. हिली बाद झाल्यानंतर कर्णधार मेग लेनिंग मैदानात उतरली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या गड्यासाठी नाबाद 101 धावांची भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्बत केले. रेचलने 100 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 93 धावांची खेळी साकारली. तर लेनिंगने 69 चेंडूत 7 चौकारासह 53 धावांची खेळी केली.

त्याआधी, भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. शफाली वर्मा (8) आणि स्मृती मंधाना (16) स्वस्तात बाद झाल्या. यानंतर यास्तिगा भाटिया आणि कर्णधार मिताली राजने भारतीय डावाची पडझड रोखली. दोघींनी तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागिदारी केली. भाटियाने 51 चेंडूत 35 धावांची खेळी केली. भाटिया बाद झाल्यानंतर दीप्ती शर्मा 9 धावा काढून बाद झाली.

वैयक्तिक अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मिताली राज देखील बाद झाली. यानंतर भारतीय डावाला गळती लागली. पूजा वस्त्राकर (17)आणि स्नेह राणा (2) झटपट बाद झाल्या. तेव्हा ऋुचा घोष आणि झूलन गोस्वामी यांनी आठव्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी करत भारताला दोनशे पार केलं. झूलन बाद झाल्यानंतर अखेरीस भारताला 50 षटकात 8 बाद 225 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ब्राउनने 4 गडी बाद केले. तर सोफी मोलिनेउस्क आणि हनाह डार्लिग्टन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

हेही वाचा -IPL 2021 : राजस्थान रॉयल्स-पंजाब किंग्स आज आमने सामने

हेही वाचा -KKR vs RCB: आरसीबीचा 'विराट' पराभव; केकेआरचे आव्हान कायम

Last Updated : Sep 22, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details