नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी आणि वनडे मालिका पार पडली आहे. या मालिकनंतर भारत आणि वेस्ट इंडीज संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांसाठी वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) येणार आहे. या मालिकांना 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्या अगोदर या मालिकेच्या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एका मालिकेतील सामने एकाच मैदानावर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघातील मालिकेला वनडे मालिकेने सुरुवात होईल त्यानंतर दोन्ही संघात टी-20 मालिका खेळळी जाईल.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील तीन ही सामने एकाच मैदानावर खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर या दोन संघातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचे आयोजन कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडतील. वनडे मालिकेप्रमाणेच या मालिकेचे देखील तीन सामने एकाच मैदानावर खेळले जातील. त्यामुळे दोन्ही संघाना प्रवासाचा ताप होणार नाही. तसेच कोरोना महामारीपासून बचाव देखील होईल.