महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना अनिर्णित, कसोटी मालिका भारताने जिंकली

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी पावसाने खेळ होऊ दिला नाही. त्यामुळे भारताने ही कसोटी मालिका 1-0 ने जिंकली आहे. भारताने चौथ्या दिवशी दमदार खेळ करत वेस्ट इंडिजच्या संघावर मात केली आहे.

India vs West Indies
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 25, 2023, 8:14 AM IST

Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मंगळवारी पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेटच्या अंतिम दिवशी पावसाने खेळ होऊ दिला नाही. पावसामुळे दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली आहे. भारताने सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. सोमवारी पोर्ट ऑफ स्पेन येथे चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात विंडीजने दोन विकेट गमावल्या. भारताला कसोटीच्या शेवटच्या दिवशी आठ बळी मिळवण्याचे आव्हान होते. मात्र पावसाने हा कसोटी सामना होऊ दिला नसल्याने भारताला 1-0 ने विजय मिळवता आला आहे.

वेस्ट इंडिजची चांगली सुरुवात :भारतीय संघाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतापुढे सामना जिंकण्यासाठी आठ बळी मिळवण्याचे आव्हान होते. मात्र वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिज संघ 76/2 वर होता. वेस्ट इंडिजचे फलंदाज टॅगेनारिन चंद्रपॉल (24) आणि जर्मेन ब्लॅकवुड (20) वर खेळत होते. रविचंद्रन अश्विनने (2/33) क्रेग ब्रेथवेट (28) आणि कर्क मॅकेन्झी (0) यांना बाद करत वेस्ट इंडिज संघाची स्थिती 44/2 अशी केली होती.

भारतीय फलंदाजांनी केली धुलाई :भारतीय संघाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. इशान किशन (34 चेंडूत 52) आणि शुभमन गिल (29) नाबाद खेळत होते. त्यावरुन पुढे खेळताना भारताने दुसरा डाव 181/2 वर घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाने 364 धावांच्या आघाडीसह विंडीजसमोर 365 धावांचे लक्ष्य ठेवले. विंडीजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रोहित शर्मा (44 चेंडूत 57) आणि यशस्वी जैस्वाल (30 चेंडूत 38) यांनी भारतासाठी जबरदस्त खेळी केल्या. भारताने केवळ 12.2 षटकात 100 धावांचा टप्पा ओलांडला. या धावा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात जलद धावा आहेत.

वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली :भारताच्या पहिल्या डावातील 438 धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 255 धावात सर्वबाद झाला. त्यावेळी वेस्ट इंडिज संघ 183 धावांनी पिछाडीवर होता. कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 235 चेंडूत 75 धावा करत विंडीजसाठी सर्वाधिक धावा केल्या. एलिक अथानाझे (37), टॅगेनारिन चंदरपॉल (33) आणि किर्क मॅकेन्झी (32) यांनीही विंडीजसाठी काही चांगल्या खेळी खेळल्या. मात्र वेस्ट इंडिजच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने 5 बळी घेत वेस्ट इंडिज संघाचे कंबरडे मोडले. मुकेश कुमार आणि रवींद्र जडेजाने दोन तर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेऊन त्याला मोलाची साथ दिली.

Last Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details