फ्लोरिडा :भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारताने दणदणीत विजय संपादन केला आहे. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ करत अर्धशतक झळकावले आहे. भाराताकडून खेळताना शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी तुफानी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने हा टी20 सामना 9 गडी राखून जिंकला आहे. शुभमन गिलने 47 चेंडूत 77 धावा केल्या, तर यशस्वी जायस्वालने 51 चेंडूत 84 धावा केल्या.
भारतीय सलामीविरांची तुफान फटकेबाजी :वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने तुफान फटकेबाजी करत वेस्ट इंडीज संघाला धूळ चारली. वेस्ट इंडीजने दिलेल्या 179 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिलने जोरदार खेळ केला. शुभमन गिलने 47 चेंडूत 77 धावा केल्या तर यशस्वी जायस्वालने 51 चेंडूत 84 धावा करुन हा विजय खेचून आणला. भारतीय सलामीविरांनी ऐतिहासिक कामगिरी करत वेस्ट इंडीज संघावर विजय मिळवला.
वेस्ट इंडीजने दिले होते 178 धावांचे लक्ष्य :वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर दाळ शिजली नाही. वेस्ट इंडीजकडून शिमरॉन हेटमायरने 61 धावा केल्या, तर शाई होपने 45 धावा करुन त्याला चांगली साथ दिली. मात्र वेस्ट इंडीजच्या इतर फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडीजने 20 षटकात 178 धावा करुन विजयासाठी भारतीय संघाला 179 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघाकडून खेळताना अर्षदीप सिंगने 3 बळी घेत वेस्ट इंडीज संघाचे कमरडे मोडले. कुलदीप यादवने 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमारने प्रत्येकी एक बळी घेतला.
दोन सामने गमावल्यानंतर भारताची मुसंडी :वेस्ट इंडीज संघाविरोधातील पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारली. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात खेळत भारताने दोन सामन्यात हार पत्करल्यानंतर सलग दोन सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यामुळे आता पाचवा टी20 सामना चांगलाच रंगतदार होणर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.