नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. कोहली श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू बनला आहे.
महेला जयवर्धनेला मागे टाकले : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने 110 चेंडूत नाबाद 166 धावांची खेळी केली. या सामन्यात 62 धावांचा आकडा गाठताच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत महेला जयवर्धनेला मागे टाकले. कोहलीच्या आता वनडे फॉरमॅटमध्ये 268 सामन्यात 12754 धावा झाल्या आहेत. यादरम्यान त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत.
सचिनचा घरच्या मैदानावरील शतकाचा विक्रम मोडला :या सामन्यात शतकासोबतच विराटने सचिन तेंडुलकरचा भारतीय भूमीवर शतक ठोकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारतीय भूमीवर 20 शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या शतकासह विराट कोहलीच्या नावावर आता भारतात 21 शतके करण्याचा विक्रम झाला आहे. याआधी विराटने श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या वनडेतही शतक झळकावले होते. विराट कोहलीने आतापर्यंत 486 सामन्यांमध्ये 74 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 664 सामन्यांमध्ये 100 शतकांचा विक्रम आहे.