कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डावखुरा फलंदाज भनुका राजपक्षा याचे एका वर्षासाठी निलंबन केले आहे. तसेच त्याला जवळपास ३.७१ लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. असे असले तरी ही निलंबनाची कारवाई दोन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आली आहे. यामुळे भनुकाचे तात्काळ निलंबन होणार नाही. त्यामुळे तो सध्या सरावादरम्यान संघासोबत आहे. तसेच निर्बंध लागू होण्यास काही वेळ असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण -
भनुका राजपक्षावर प्लेयर कॉन्ट्रेक्ट २०१९-२० चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याने मीडियामध्ये श्रीलंका बोर्डाविरोधात प्रश्न उपस्थित केले. श्रीलंकन संघातून काढल्याबद्दल भनुका राजपक्षाने सार्वजनिक रूपात विरोध देखील दर्शविला होता. इंग्लंड दौऱ्यात त्याला संघात स्थान द्यायला हवे होतं, असे भनुकाचे म्हणणे होते.
भनुका राजपक्षा याने आरोप केल्यानंतर श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी, राजपक्षा फलंदाजी चांगली करतो. परंतु त्याचे क्षेत्ररक्षण चांगले नाही. याशिवाय त्याचे फिटनेसही ठिक नाही. यामुळे त्याला खेळताना अडचणी येतात, असे सांगितले होते.