कोलंबो - भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका होणार की नाही, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही कोरोनाली लागण झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे बीसीसीआयने उभय संघातील मालिकेचे नवे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या श्रीलंकचे खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डाटा विश्लेषक जी टी निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे बीसीसीआयने १३ जुलैपासून सुरू होणारी मालिका १८ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्लान बी म्हणून पर्यायी खेळाडूंचा चमू तयार ठेवला होता. पण, आता या संघातील एक खेळाडूंना कोरोना झाल्याचे वृत्त आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडी याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या डंबुला येथे असलेल्या शिबिरात सराव करत होता.
दरम्यान, श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने श्रीलंकेच्या बोर्डाकडे संघाचे हॉटेल बदलण्याची मागणी केली होती. बीसीसीआयची मागणी मान्य करीत श्रीलंका बोर्डाने आपल्या खेळाडूंना हॉटेल समुद्रामधून ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये हलवले आहे. उभय संघातील हा दौरा रद्द झाल्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सुमारे ९० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे श्रीलंका बोर्ड ही मालिका खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.