सेंच्युरियन Ind Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. सेंच्युरियनमध्ये काल रात्रभर पाऊस पडला. त्यामुळे आज पहिल्या दिवशीचा खेळ सुरू होण्यास विलंब झाला. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसअखेर टीम इंडियाचा स्कोर ५९ षटकात ८ बाद २०८ धावा आहे.
रोहित शर्मा स्वस्तात परतला : सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत केवळ ५ धावा करून बाद झाला. रबाडानं त्याची विकेट घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुभमन गिलही काही कमाल करू शकला नाही. तो १२ चेंडूत २ धावा करून नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीत बाद झाला. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालही स्वस्तात तंबूत परतला. बर्गरनं त्याला १७ धावांवर बाद केलं. लंचपर्यंत भारतीय संघानं २६ षटकांत ३ गडी गमावून ९१ धावा केल्या होत्या.
रबाडाची घातक गोलंदाजी : खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. रबाडानं खेळपट्टीवर जम बसवलेल्या श्रेयस अय्यरला क्लिन बोल्ड केलं. तो ५० चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ कोहलीही तंबूत परतला. त्याला रबाडानं ६४ चेंडूत ३८ धावांवर बाद केलं. त्यानंतर अश्विन आणि शार्दूल ठाकूरलाही रबाडानंच माघारी पाठवलं. हे दोघं अनुक्रमे ८ आणि २४ धावा करून बाद झाले. सध्या के एल राहुल (१०५ चेंडूत ७० धावा) आणि मोहम्मद सिराज (१० चेंडूत ० धावा) क्रिजवर आहेत.
प्रसिद्ध कृष्णाचं पदार्पण : आज दोन्ही संघाकडून एकूण ३ खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं. भारताकडून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा तर दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम हे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या पाठीत दुखणं जाणवत असल्यानं त्याला आजच्या सामन्यासाठी आराम देण्यात आलाय. त्याच्या जागी आर अश्विनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. यासोबतच शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे.