सेंच्युरियन IND Vs SA Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ बुधवारी (२७ डिसेंबर) संपला. दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ २४५ धावांवर ऑलआऊट झाला होता. भारताकडून केएल राहुलनं शानदार शतक झळकावलं.
एल्गरचं नाबाद शतक : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ५ विकेट गमावत २५६ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे आफ्रिकेनं भारताविरुद्ध पहिल्या डावात ११ धावांची आघाडी घेतली. आज डीन एल्गरनं आपल्या कारकिर्दीतील १४ वे शतक झळकावलं. एल्गर नाबाद १४० आणि मार्को जॅनसेन नाबाद ३ क्रिजवर आहेत. एल्गरनं पहिला सामना खेळत असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमसोबत चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. बेडिंगहॅमनं पदार्पणाच्या डावात अर्धशतक साजरं केलं. तो ५६ धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी २-२ बळी घेतले. प्रसिध्द कृष्णाला एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेच्या विकेट
- एडन मार्कराम (५), मोहम्मद सिराज, ३.५ ओव्हर (११/१)
- टोनी डी जोर्जी (२८), जसप्रीत बुमराह, २८.६ ओव्हर (१०४/२)
- कीगन पीटरसन (२), जसप्रीत बुमराह, ३०.२ ओव्हर (११३/३)
- डेव्हिड बेडिंगहॅम (५६), मोहम्मद सिराज, ६०.१ ओव्हर (२४४/४)
- काइल व्हेरीन (४), प्रसिद्ध कृष्णा, ६१.५ ओव्हर (२४९/५)
केएल राहुलचं शतक :भारतासाठी दुसऱ्या दिवसाची एकमेव दिलासादायक बाब म्हणजे केएल राहुलचं शतक. राहुलनं जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून कसोटी क्रिकेटमधील आपलं आठवं शतक पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे त्याचं शेवटचं कसोटी शतक २६ डिसेंबर २०२१ रोजी याच मैदानावर आलं होतं.
राहुलची एकाकी झुंज :भारताचा पहिला डाव समाप्त झाला असून टीम इंडिया ६७.४ षटकात २४५ धावांवर ऑलआऊट झाली. केएल राहुल १३७ चेंडूत १०१ धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरनं त्याची विकेट घेतली. भारताकडून राहुल शिवाय इतर कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. विराट कोहली ६४ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. तर शार्दुल ठाकूरनं ३३ चेंडूत २४ धावांचं योगदान दिलं.