भुवनेश्वर:सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळळी जात आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीत खेळला गेला, जो दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला. या मालिकेतील दुसरा सामना 12 जून रोजी बाराबती स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ कडेकोट बंदोबस्तात शुक्रवारी ओडिशात ( IND SA both teams reach Bhubaneswar ) पोहोचले. दोन्ही संघ दुपारी 2 वाजता भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो क्रिकेट चाहते तेथे उपस्थित होते.
विमानतळावरील रस्त्याच्या दुतर्फा, हॉटेलच्या बाहेर आणि दोन्ही ठिकाणी जाताना क्रिकेटप्रेमी त्यांच्या क्रिकेट स्टार्सची झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसले. ओडिशा क्रिकेट असोसिएशन ( Odisha Cricket Association ) च्या सदस्यांनी विमानतळावर खेळाडूंचे स्वागत केले आणि कडक सुरक्षेमध्ये त्यांना विशेष बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात आले.
रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी ओडिशाचे पोलीस महासंचालक एसके बसल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने बाराबती स्टेडियममधील व्यवस्थेचा आढावा घेतला. खेळाडूंना सुरक्षित वातावरणात, रविवारी सामना सुरळीत पार पाडण्यासाठी आणि शनिवारी सराव करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे बसल यांनी पत्रकारांना सांगितले.