गाकबेर्हा (दक्षिण आफ्रिका) India Vs South Africa 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केलाय. भारतीय संघानं पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर टोनी डी जॉर्जीनं नाबाद 119 धावांची खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिलाय. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम गोलंदाजीत चमत्कार केला आणि नंतर फलंदाजीत ताकद दाखवत सामना एकतर्फी जिंकला. या विजयासह आफ्रिकेनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय.
आफ्रिकेची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी :सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन संघाच्या गोलंदाजांनी कर्णधार एडन मार्करमचा निर्णय योग्य ठरवत भारतीय संघाला 211 धावात गुंडाळलं. भारतासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या साई सुदर्शननं 62 धावांची सर्वात मोठी खेळी केली. ज्यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. याशिवाय कर्णधार के एल राहुलनं 7 चौकार लगावत 56 धावा केल्या. त्यानंतर मात्र भारतीय संघाचे फलंदाज अपयशी ठरले. गोलंदाजीत आफ्रिकेच्या नांद्रे बर्गरनं सर्वाधिक 3 बळी घेतले.
आफ्रिकेचा सहज विजय : प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 46.2 षटकात 211 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं लक्ष्याचा पाठलाग करताना 42.3 षटकात 2 गडी गमावून लक्ष्य गाठलं. टोनीशिवाय रिझा हेंड्रिक्सनं आफ्रिकेकडून 52 धावांची खेळी केली. टोनी आणि हेंड्रिक्समध्ये पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी झाली आणि इथंच आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला गेला.