कोलंबो : Ind Vs Pak Asia Cup २०२३ : सोमवारच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. पावसामुळं सामना दोन दिवस चालला.सुरुवातीला फलंदाजी करत भारतानं 356 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत 8 बाद 128 धावाच करता आल्या. नसीम शाह, हरिस रौफ दुखापतीमुळं फलंदाजी करू शकले नाहीत.
दणदणीत विजय : भारतीय संघानं पाकिस्तानवर 228 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2008 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये 140 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला होता.
चौथ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागिदारी : पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजांनी धुवांधार फलंदाजी करत 50 षटकांत 356-2 धावा केल्या. विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमधलं 47 वं शतक साजरं केलं. त्यानं 94 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. त्याला केएल राहुलनं उत्तम साथ दिली. राहुलनं वनडेतलं सहावं शतक ठोकलं. त्यानं 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी केली.
हरिस रौफ खेळला नाही : सोमवारी दुपारी कोलंबोत पाऊस थांबला होता. त्यानंतर ४.४० वाजता सामन्याला पुन्हा सुरुवात झाली होती. रविवारचा खेळ थांबला तेव्हा कोहली आणि राहुल क्रिजवर होते. सोमवारी त्यांनी त्याच धावसंख्येवरून डावाला पुन्हा सुरुवात केली. हरिस रौफ दुखापतीमुळं सोमवारचा सामना खेळला नाही. त्याचा फटका पाकिस्तानला बसला. त्याच्या अनुपस्थितत कोहली आणि राहुलनं मिळून पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरश: नेस्तनाबूत केलं.
कोहलीच्या वनडेमध्ये १३००० धावा पूर्ण : विराट कोहलीनं सोमवारी वनडे क्रिकेटमध्ये १३००० धावा पूर्ण केल्या. हा पल्ला गाठणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. त्यानं २६७ डावांत ही कामगिरी पूर्ण केली. या आधी हा विक्रम (३२१ डाव) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावे होता.
रविवारी पावसानं खोळंबा घातला : आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात दोन दिवस पावसानं खोळंबा घातला. रविवारी २४.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे मॅच थांबवण्यात आली. तेव्हा भारताची धावसंख्या १४७-२ होती. सोमवारी दुपारी ३ वाजता पुन्हा सामना सुरू होणार होता. मात्र, सोमवारीही पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. अखेर सामना भारतानं जिंकला आहे.
फक्त भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच उत्साह दिसून येतो. आशिया चषकात यापूर्वी ८ सप्टेंबरला या दोन संघात सामना झाला. मात्र तो सामना पावसामुळे वाहून गेला होता. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) सुपर ४ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर केला. एसीसीच्या या निर्णयावर श्रीलंका आणि बांग्लादेशच्या क्रिकेट बोर्डांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा :
- Ind Vs Pak Asia Cup २०२३ : राहुल की इशान, कोणाला मिळणार संधी; जाणून घ्या आकडे काय सांगतात
- Shubhman Gill on Pakistan Pace Attack : पाकिस्तानी गोलंदाजीवर आपण का अडखळतो? शुभमन गिलनं सांगितलं धक्कादायक कारण
- World Cup २०२३ : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या कोणाची लागली लॉटरी, कोणाचा पत्ता कट झाला