हैदराबाद (तेलंगणा): येथे खेळल्या गेलेल्या अतिशय रोमांचक सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव झाला आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड संघापुढे 350 धावांचे लक्ष्य ठेवत त्यांचा12 धावांनी पराभव केला. मायदेशी खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. गिलने एका टोकाला दुहेरी शतक झळकावले. सलग तीन षटकार मारत त्याने आपले द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक करणारा भारताचा तो पाचवा फलंदाज ठरला असून, त्याने भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास निर्माण केला आहे.
न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव : भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडपुढे 350 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावांची वादळी खेळी केलेली व्यर्थ ठरली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला 337 धावांवर रोखून अवघ्या 12 धावांनी विजयी मिळवला आहे. न्यूझीलंड संघ 49.2 षटकात 337 धावांवर सर्वबाद झाला.
१९ चौकार आणि ९ षटकार:या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने त्यांचे तीन विकेट लवकर गमावले होते. मात्र सलामीवीर शुभमन गिल खंबीरपणे उभा राहिला. या सामन्यात गिलने पहिले द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल हा 5वा भारतीय ठरला. गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले.