नवी दिल्ली :मध्यप्रदेशातील इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मंगळवारी दुपारी 1.30 वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर तिसऱ्या वनडेत दोन्ही संघ आपापल्या परीने सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता पाहुण्या संघावर आजच्या सामन्यात पुन्हा एकदा विजय मिळवून मालिका खिशात घालणे हेच भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे.
खेळपट्टी खेळाडूंसाठी ठरणार वरदान:आजचा सामना म्हणजे भारतासाठी ही सुवर्णसंधी असेल. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ आपला ठसा उमटवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल होऊ शकतात. पण ज्या खेळपट्टीवर एवढा रोमांचक सामना होणार आहे त्या खेळपट्टीची काय स्थिती आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. सध्या ही खेळपट्टी कोरडी असून, खेळाडूंसाठी वरदान ठरणार आहे. या मैदानावर आतापर्यंत 2 कसोटी सामने, 5 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले गेले आहेत.
होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल:हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, इंदूरचे हवामान मंगळवारी दुपारी किंचित उष्ण राहू शकते. यावेळी तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र, सायंकाळनंतर तापमानात घट होईल. संध्याकाळी तापमान सुमारे 13 अंश सेल्सिअस असू शकते. याशिवाय पावसाची अजिबात शक्यता नाही. त्याचबरोबर होळकर स्टेडियमची क्षमता ३० हजार प्रेक्षकांची आहे. या मैदानाची सीमा तुलनेने लहान आहे. या मैदानाची चौरस सीमा सरासरी 56 मीटर आहे. याशिवाय समोरची सीमा 68 मीटर आहे.