ओवल - भारतीय संघाने ओवलमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. विशेष म्हणजे भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर होता. परंतु दुसऱ्या डावात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंडला मात दिली. बीसीसीआयने या खास विजयानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य एकमेकांना भेटताना पाहायला मिळत आहेत. त्याच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना उमेश यादव म्हणाला की, आम्हाला माहिती होती की, खेळपट्टी सपाट आहे. यामुळे आम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील, यांचा अंदाज होता. आम्ही चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि धावा कमी देण्याचा प्रयत्न केला. कारण आम्हाला माहित होते की, विकेट मिळतील.
दरम्यान, या सामन्यात उमेश यादवने दोन्ही डावात 3-3 गडी बाद केले. विशेष म्हणजे तो मागील डिसेंबरनंतर प्रथमच आपला कसोटी सामना खेळत होता.
शार्दुल ठाकूर म्हणाला की, खूप चांगलं वाटत आहे. ज्या दिवशी मला कळाले की, मी अंतिम सामन्यात आहे. तेव्हा मी माझे योगदान पूर्णपणे देण्याचा निश्चय केला होता.