ओवल - भारताने ओवल कसोटी सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर कर्णधार विराट कोहली जाम खूश झाला आहे. त्याने आपल्या गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजांविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
विराट कोहली म्हणाला की, मी एक कर्णधाराच्या भूमिकेत पाहिलेल्या, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तीन सर्वश्रेष्ठ कामगिरीतील ही एक कामगिरी आहे. हे पाहणे शानदार राहिले. आम्हाला एक संघ म्हणून विश्वास होता की, आम्ही 10 विकेट घेऊ. तुम्ही ज्याला सपाट खेळपट्टी म्हणता, तशाच प्रकारची काहीशी ही खेळपट्टी होती. उकाडा खूप होता आणि जेव्हा रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. तेव्हा आम्हाला माहिती होते की विजयाची संधी आहे. गोलंदाजांनी रिव्हर्स स्विंगचा मारा करत चांगली गोलंदाजी केली.
दरम्यान, जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने ओली पोप (2) आणि जॉनी बेयरस्टो (0) यांना क्लिन बोल्ड केले. याविषयी विराट कोहली म्हणाला, जेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता, तेव्हा जसप्रीत बुमराहने गोलंदाजी देण्यास सांगितलं. त्याने जो स्पेल टाकला यात दोन मोठे विकेट मिळाल्या आणि सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकले.
विराट कोहलीने शार्दुल ठाकूरचे देखील कौतुक केले. तो म्हणाला, शार्दुलने जो खेळ केला. तो तुमच्या पुढे आहे. त्याने दोन अर्धशतके झळकावत विरोधी संघाला दडपणात ढकलले.