नाटिंघम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा आज पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. पण पाऊस सुरू असल्यामुळे सामन्याला सुरूवात होण्यास विलंब होत आहे. चौथ्या दिवसाअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या आहे. भारताला विजयासाठी आणखी 157 धावांची गरज आहे.
केएल राहुलच्या रुपाने इंग्लंडला पहिले यश मिळाले आहे. चौथ्या दिवसाअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद आहेत. दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यावर पकड निर्माण केली आहे. पाऊस थांबला आणि खेळ झाला तर भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने 46 धावांत 4 बळी घेतले. मोहम्मद शमीला 3 आणि शार्दुल ठाकूरला 2 बळी घेता आले. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 278 धावा केल्या. यात केएल राहुलने सर्वाधिक 84 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळाली.