मुंबई India Vs Australia :मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघानं भारतीय महिलांचा 190 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं भारतावर 3-0 ने विजय मिळवत मालिका क्लीन स्वीप केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 धावांच्या विशाल लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 32.4 षटकात 148 धावांवर ऑल आऊट झाला.
टीम इंडियाचा 148 धावांवर धुव्वा : सलामीवीर फीबी लिचफिल्डचं शानदार शतक (119 धावा) आणि कर्णधार अॅलिसा हिलीच्या 82 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियानं भारताला 339 धावांचं मोठं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या 148 धावांवर ऑलआऊट झाला. भारताच्या सहा खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून स्मृती मानधनानं सर्वाधिक 29 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 25 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरी लेगस्पिनर जॉर्जिया वेरेहमनं सर्वाधिक 3 बळी घेतले.
लिचफिल्डची चमकदार कामगिरी : ऑस्ट्रेलियाची 20 वर्षीय डावखुरी सलामीवीर फलंदाज लिचफिल्डनं या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावल्यानंतर तिनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 125 चेंडूत 119 धावा ठोकल्या. या दरम्यान तिनं 16 चौकार आणि 1 षटकार लगावला. या खेळीसाठी तिला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. लिचफिल्डनं संपूर्ण मालिकेत एकूण 260 धावा केल्या. या कामगिरीसाठी तिला 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.
शुक्रवारपासून टी-20 मालिका : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 5 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता खेळला जाईल. एकमेव कसोटीत भारताकडून 8 विकेट्सनं पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियानं एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकून शानदार पुनरागमन केलंय. आता T20 मध्ये कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
हे वाचलंत का :
- कसोटी क्रिकेटचे दिग्गज वॉर्नर अन् एल्गर खेळणार अखेरचा सामना, एक नजर आकडेवारीवर
- क्रिकेट चाहत्यांना यंदा टी-२० वर्ल्डकपची मेजवानी, 'या' महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार; जाणून घ्या टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक