नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्यामुळे ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. सध्या बीसीसीआयने तिसऱ्या कसोटीच्या स्थानाबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, पण या कसोटीच्या यजमानपदासाठी इंदूर आणि राजकोट आघाडीवर आहेत.
मैदानावर नवीन ड्रेनेज सिस्टमची स्थापना : बोर्डाच्या तपासणी समितीच्या अहवालानंतर धर्मशाळेतून कसोटी दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुत्रांनुसार जागेबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची अपेक्षा आहे. या पॅनेलने 11 फेब्रुवारी रोजी मैदानाला भेट दिली होती. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मैदानावर नुकतीच नवीन ड्रेनेज सिस्टम स्थापित केली आहे, मात्र त्यामुळे मैदानाच्या आऊटफिल्डवर अनेक अव्यवस्थता दिसून येते आहे.
खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका :हिमाचल प्रदेशात सध्या थंडी पडत आहे. त्यामुळे गवत वाढू शकले नाही. स्टेडियमचे आउटफिल्ड वाळू आणि कापसाचे बनलेले आहे. कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर दाट गवत असणे आवश्यक आहे. वाळूचे प्रमाण जास्त असल्याने गवत नीट वाढले नाही, त्यामुळे मैदानावरील खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका आहे. आणखी एक अडथळा असा होता की, फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन टी-२० सामन्यांनंतर धर्मशालामध्ये कोणतेही क्रिकेट खेळले गेले नाही. धर्मशालाने आतापर्यंत फक्त एकच कसोटी आयोजित केली आहे. 2017 मधील त्या एकमेव कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली होती.
भारताची मालिकेत आघाडी : नागपुरात खेळली गेलेली पहिली कसोटी भारताने तीन दिवसांत गुंडाळली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांत गुंडाळला. प्रत्युतरात भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 91 धावांत गारद झाला. दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळली जाणार आहे.
हेही वाचा :IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारताशी कसा होईल सामना? फिरकीपटूंवर राहावे लागेल अवलंबून