बंगळुरू India Vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या. आता अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं लक्ष्य आहे.
विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद : या सामन्यात एकेकाळी भारतीय संघाची अवस्था 22 धावांवर 4 विकेट अशी झाली होती. यशस्वी 4 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (1) आणि संजू सॅमसन (0) देखील झटपट बाद झाले आहेत. मात्र यानंतर रोहित शर्मानं रिंकू सिंहच्या मदतीनं टीम इंडियाची धुरा सांभाळत 5व्या विकेटसाठी 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली.
रोहित शर्माचं पाचवं शतक : रोहित शर्मानं 64 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर रिंकू सिंहनं आंतरराष्ट्रीय टी 20 मधील दुसरं अर्धशतक झळकावलं. त्यानं 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात रोहितनं 69 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 8 षटकार आणि 11 चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूनं 39 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी केली. त्यानं 6 षटकार आणि 2 चौकार मारले. रोहितनं या मालिकेत प्रथमच आपलं खातं उघडलं. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला होता.
मालिका आधीच खिशात घातली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आजचा तिसरा सामना जिंकला तर भारतीय संघ अफगाणिस्तानला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करेल. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं मालिका आधीच खिशात घातली आहे. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये टी 20 विश्वचषक खेळायचा आहे. याआधी भारताची ही शेवटची टी 20 मालिका आहे. या दृष्टीनंही हा शेवटचा सामना आहे.