कोलंबो -भारतीय संघ दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. उभय संघात या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत आहे. यात भारतीय संघाने सरावादरम्यान, आपापसातच एक टी-२० सामना खेळला.
आपापसात पार पडलेल्या सामन्यात एका संघाचे नेतृत्व शिखर धवन याने केले. तर दुसऱ्या संघाचा कर्णधार भुवनेश्वर कुमार होता. धवनच्या संघात ऋतुराज गायकवाड, मनीष पांडे यांचा समावेश होता. तर भुवीच्या संघात सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल होते.
धवन इलेव्हन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ३० धावांचे योगदान दिले. तर मधल्या फळीत मनीष पांडे ६३ धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार भुवनेश्वरने ४ षटकांत २३ धावांत २ गडी बाद केले.
धवन इलेव्हनने दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनी ६० धावांची सलामी दिली. सूर्यकुमारने यादवने अर्धशतकी खेळी केली. धवन इलेव्हनने दिलेले लक्ष्य भुवनेश्वरने इलेव्हनने १७ षटकांतच गाठले.
दरम्यान, हा सराव सामना असल्याने भुवनेश्वर इलेव्हन संघाला पुढेही फलंदाजी सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आणि त्यांना ४ षटकांत ४० धावांचे आव्हान देण्यात आल्याची माहिती भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी दिली. याचे कारण, आम्हाला खेळाडूंवर दबाव टाकायचा होता, असे म्हाम्ब्रे यांनी सांगितलं. बीसीसीआयने म्हाम्ब्रे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते सराव सामन्याविषयी माहिती देताना दिसत आहेत.