मुंबई - भारतीय संघ एकाच वेळी दोन देशाच्या दौऱ्यावर आहे. सीनिअर संघ इंग्लंड तर युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका पाठोपाठ एक असे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. तेव्हा त्यांच्या जागेवर निवड समितीने रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडसाठी बोलावणे आले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी गेलेला सलामीवीर शुबमन गिलला दुखापत झाली. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच यातून बाहेर पडला. अशात सराव सामन्यादरम्यान, नेट गोलंदाज आवेश खान आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांना देखील दुखापत झाली. ते देखील मालिकेतून बाहेर पडले. यामुळे निवड समितीने त्यांच्या जागेवर रिप्लेंसमेंट म्हणून दोन खेळाडूंची निवड केली.
सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांनी श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ याने 9 चौकारांसह 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तर सुर्यकुमार यादवने या मालिकेतील तीन सामन्यात एकूण 124 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या टी-20 सामन्यात देखील अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी बोलावणे आले आहे. दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.