अॅडलेड - आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानी विराजमान आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गुणांच्या बाबतीत स्मिथजवळ पोहोचला आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये आता फक्त १३ गुणांचा फरक आहे.
हेही वाचा -व्हिडिओ : रोनाल्डोने जिंकला प्रतिष्ठित 'गोल्डन फूट' पुरस्कार
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर नवीन कसोटी क्रमवारी जाहीर झाली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने ७४ धावा केल्या. पण दुसऱ्या डावात तो फक्त चार धावा करू शकला. पहिल्या डावात स्मिथने २९ चेंडूत १ धाव केली, तर दुसऱ्या डावात तो एक धावा करून नाबाद राहिला होता.
पेनला मिळाली सर्वोत्तम क्रमवारी -
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशानेने ४७ आणि सहा धावांची खेळी केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट ८३९ गुण मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने पहिल्या डावात नाबाद ७३ धावा केल्या. पेन आता कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट ३३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या डावात ५१ धावांवर नाबाद राहिलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्स आता ४८व्या स्थानावर पोहोचला आहे. २०१६ नंतर प्रथमच तो पहिल्या-५० क्रमांकात आला आहे.
गोलंदाजांची क्रमवारी -
सामन्यात सात बळी घेणाऱ्या पॅट कमिन्सने सहा गुणांची कमाई केली आहे. तो दुसर्या स्थानावर असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडपेक्षा फार पुढे आहे. अॅ़डलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूड पहिल्या पाच क्रमांकात परत दाखल झाला आहे. भारताकडून पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने नववे स्थान मिळवले आहे. बुमराह दहाव्या स्थानावर घसरला आहे.