मेलबर्न -तामिळनाडूचा 'मुस्तफिजूर' म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज टी. नटराजन भारताच्या कसोटी संघात सामील झाला आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नटराजन भारतीय संघात गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. बीसीसीआयने शुक्रवारी ही माहिती दिली.
हेही वाचा -सय्यद मुश्ताक अली चषक : अनुस्तुप मजूमदार बंगाल संघाचा कर्णधार
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीचे स्नायू ताणले गेल्याने त्याने दुसऱ्या डावात चौथे षटक टाकत असतानाचा मैदान सोडले होते. सामन्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उमेशची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आले. या दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापूर्वी शार्दुल ठाकूरलाही मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते. नटराजन आणि शार्दुल या दोघांचाही मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होता. त्यानंतर कसोटी मालिकेसाठी सरावाचे गोलंदाज म्हणून ते ऑस्ट्रेलियातच थांबले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण -
याच ऑस्ट्रलिया दौऱ्यात नटराजनने भारताकडून एकदिवसीय आणि टी-२० मध्ये पदार्पण केले. त्याने या दौऱ्यात एकूण १ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले. यात त्याने ८ फलंदाजांना माघारी धाडले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील अॅडलेड येथील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पुनरागमन केले आणि दुसरा सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.